
भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही स्थिर
नवी दिल्ली, 23 जुलै (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय तेलबाजारात पुन्हा एकदा मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महत्त्वाचा तेलवाहतूक मार्ग मानल्या जाणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या सहा आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांची वाढ होऊन प्रति बॅरल 96 डॉलरपर्यंत मजल मारली आहे. तर अमेरिकन डब्ल्यूटीआय क्रूडचा भावही वाढून प्रति बॅरल 88.24 डॉलरवर पोहोचला आहे. हे दोन्ही प्रमुख आंतरराष्ट्रीय बेंचमार्क सध्या सहा आठवड्यांतील सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत आहेत.
हॉर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेलवाहतूक मार्ग मानला जातो. आखाती देशांतून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गाने जगभर पोहोचतो. त्यामुळे हा मार्ग बंद राहिल्यास जागतिक तेलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास जागतिक स्तरावर तेलटंचाई निर्माण होऊन कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आणखी मोठी वाढ होऊ शकते, अशी भीती बाजारात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असली तरी भारतातील ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल , हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. मात्र दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसह देशातील बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर सध्या स्थिर आहेत.सध्याच्या दरानुसार भारतात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.12 रुपये, तर डिझेलचा दर 95.30 रुपये प्रतिलिटर इतका आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी