
ग्लासगो, २३ जुलै (हिं.स.)२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भारताने आपले पहिले पदक निश्चित केले आहे. ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनला 'बाय' मिळाल्याने, तिने थेट उपांत्य फेरीत प्रवेश करून आपले पदक निश्चित केले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेनला 'बाय' मिळाल्यानंतर तिने महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या सोडतीमध्ये केवळ पाच खेळाडू होत्या, त्यामुळे लव्हलिनासह त्यापैकी तिघींनी थेट अंतिम चारमध्ये (उपांत्य फेरी) प्रवेश केला, तर उर्वरित दोघींना उपांत्यपूर्व फेरीचा एकच सामना खेळावा लागला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॉक्सिंग नियमांनुसार, उपांत्य फेरीतील सर्व पराभूत खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते. याचा अर्थ, ग्लासगोमधील तिच्या पहिल्या लढतीपूर्वीच लव्हलिनाचे कांस्यपदक निश्चित झाले आहे.
लव्हलिना ३१ जुलै रोजी उपांत्य फेरीत तफाकीविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, जिथे तिला सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. विजय मिळाल्यास ती अंतिम फेरीत पोहोचेल आणि किमान रौप्य पदक मिळवेल, तर पराभव झाल्यासही तिला कांस्य पदक मिळेल.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे तिचे पहिलेच पदक असेल. लव्हलिना गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत गतविजेती सँडी रायनकडून पराभूत झाली होती आणि बर्मिंगहॅम २०२२ मध्ये तिने आपली पहिली लढत गमावली होती. यापूर्वीच्या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने ६९ किलो वजनी गटात भाग घेतला होता.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे