नीटच्या मुद्द्यावर सरकार चर्चेस तयार, पण काँग्रेसने चर्चेसाठी अटी घातल्या: किरेन रिजिजू
नवी दिल्ली, २३ जुलै (हिं.स.) : पेपरफुटी प्रकरणावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळादरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहे, पण काँग्रेसने चर्चेसाठी अटी घातल्या आहेत. रिजिजू म्
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू


नवी दिल्ली, २३ जुलै (हिं.स.) : पेपरफुटी प्रकरणावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळादरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहे, पण काँग्रेसने चर्चेसाठी अटी घातल्या आहेत.

रिजिजू म्हणाले की, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यास सरकार आणि सर्व पक्ष सहमत झाले होते, पण राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने चर्चेपूर्वी अटी घातल्या. किरेन रिजिजू म्हणाले की, या मुद्द्याचे राजकारण केले जाऊ नये आणि त्यावर कोणत्याही अटी लादल्या जाऊ नयेत.

ते म्हणाले की, सरकारला या मुद्द्याचे राजकारण न करता दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करायची आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचाही रिजिजू यांनी उल्लेख केला. रिजिजू म्हणाले की, अध्यक्षांनी सभागृहात चर्चेसाठी वेळ निश्चित करावी. आम्ही आजच चर्चेसाठी तयार आहोत.

यावर प्रतिक्रिया देताना, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधानांचे आजचे वक्तव्य 'प्रक्षोभक' होते. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि निष्पक्ष चर्चेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले. यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande