
काबुल, 23 जुलै (हिं.स.) । अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज रहमत शाह यांची राष्ट्रीय संघाचे नवीन कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिलेल्या हशमतुल्ला शाहिदी यांची जागा घेतली आहे. शाह यांनी २०२१ पासून कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारांमध्ये संघाचे उपकर्णधार म्हणून काम पाहिले होते.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांचा अनुभव, नेतृत्व आणि संघाची सखोल जाण अफगाणिस्तान क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल. बोर्डाने यष्टीरक्षक-फलंदाज रहमनुल्ला गुरबाज यांची कसोटी आणि एकदिवसीय संघांचे नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केल्याचीही घोषणा केली. हे दोन्ही क्रिकेटपटू आयर्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेपासून आपल्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतील.
हशमतुल्ला शाहिदी यांची मे २०२१ मध्ये अफगाणिस्तानचे कर्णधार म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध मालिका जिंकून आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली. त्यांच्या कर्णधारपदाखाली अफगाणिस्तानने ५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७ विजय नोंदवले आहेत. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात, संघाने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्ससारख्या संघांना पराभूत करून उत्कृष्ट कामगिरी केली आणि गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले. २०२३ च्या विश्वचषकातील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, अफगाणिस्तानने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली. शाहिदीच्या नेतृत्वाखाली, संघाने त्यांच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करून पाचवे स्थान मिळवले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे