
तब्बल 1264 कोटींच्या गुंतवणुकीत उभारणार तिसरा-चौथा रेल्वेमार्ग
नवी दिल्ली, 24 जुलै (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बल्लारी-गुंटकल रेल्वे विभागात तिसरी आणि चौथी रेल्वेमार्ग उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी 1264 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, तो 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 46 किलोमीटरची वाढ होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 99 गावांतील सात लाखांहून अधिक नागरिकांना अधिक सक्षम आणि जलद रेल्वे संपर्काचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, या प्रकल्पामुळे बल्लारी किल्ला आणि श्री कुमारस्वामी मंदिर यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपर्यंतची रेल्वे जोडणी अधिक सुलभ होणार आहे. तसेच लौहखनिज, डोलोमाइट, चुनखडी, लोखंड व पोलाद, कोळसा, खते आणि धान्य यांसारख्या महत्त्वाच्या मालवाहतुकीसाठी हा मार्ग अधिक सक्षम ठरणार आहे. रेल्वे मार्गाची क्षमता वाढल्यानंतर दरवर्षी 16.22 दशलक्ष टन (एमटीपीए) अतिरिक्त मालवाहतूक शक्य होणार असून, त्यामुळे रेल्वे वाहतुकीतील गर्दी कमी होऊन मालवाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षम होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
हा प्रकल्प पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत विकसित करण्यात येत असून, एकात्मिक नियोजन, बहुविध वाहतूक व्यवस्था (मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी) आणि लॉजिस्टिक्स क्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी, माल आणि सेवांच्या वाहतुकीस अखंड व अधिक विश्वासार्ह रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असून भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणखी बळकट होईल. पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेच्या विस्तारामुळे देशाच्या हवामान उद्दिष्टांना चालना मिळणार आहे. सरकारच्या अंदाजानुसार, या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 1.32 कोटी लिटर इंधनाची बचत होईल, तर 6.67 कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्याची अपेक्षा आहे. हा पर्यावरणीय लाभ सुमारे 27 लाख झाडे लावण्याइतका मानला जात आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी