
शिमला, 24 जुलै (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या लाहोल-स्पीती जिल्ह्यात आज, शुक्रवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. तिंदीहून पांगीकडे जात असलेल्या टाटा सूमो टॅक्सीवर अचानक डोंगरावरील भली मोठी दरड कोसळल्याने वाहन चिरडले गेले. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार उदयपूर-किलाड (तांदी-संसारी राष्ट्रीय महामार्ग) मार्गावरील कडू नाला परिसरात हा अपघात घडला. अपघातग्रस्त टाटा सूमो (क्रमांक : एचपी-01एम-2210) कुल्लूहून पांगीकडे जात होती. वाहनात चालकासह सुमारे 14 प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे.मागील दिवशी मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याने उदयपूर-किलाड मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे सर्व प्रवासी तिंदी येथे थांबले होते. शुक्रवारी मार्ग सुरू झाल्यानंतर वाहन पांगीकडे रवाना झाले. मात्र, कडू नाला परिसरात अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळून प्रचंड दगड आणि मलबा वाहनावर पडल्याने ही दुर्घटना घडली.
घटनेनंतर सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच लाहुल पोलीस, तिंदी पोलीस ठाण्याचे पथक, उदयपूर प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. पांगीचे कार्यकारी निवासी आयुक्त तथा उपविभागीय अधिकारी (एसडीएम) अमनदीप सिंग यांनीही घटनास्थळी रवाना होऊन बचाव मोहिमेवर देखरेख सुरू केली आहे.सतत खराब हवामान आणि डोंगरावरून कोसळणाऱ्या मलब्यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून अद्याप मृतांची अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन आणि अधिकृत स्रोतांकडून जारी करण्यात येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी