
नवी दिल्ली, 24 जुलै (हिं.स.) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आज, शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बेअंत सिंग यांचे नातू असून सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार आहेत.
बिट्टू यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आनंदपूर साहिब मतदारसंघातून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी पंजाबच्या लुधियाना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच 2017 मध्ये त्यांनी जलालाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्याकडून पराभव झाला. तर 2021 मध्ये त्यांनी लोकसभेत काँग्रेसचे नेते म्हणूनही काम पाहिले होते. परंतु, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लुधियाना मतदारसंघातून अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीत पराभव होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांची केंद्रीय रेल राज्यमंत्री तसेच अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2024 ते 2026 या कालावधीत त्यांची राजस्थानमधून राज्यसभेवर निवड झाली होती.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी