
- विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारचे कठोर पाऊल
- एनटीएच्या पुनर्रचनेची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार
नवी दिल्ली, 24 जुलै (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी परीक्षा आयोजित करणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) गेल्या काही काळापासून पेपरफुट आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांमुळे वादाच्या केंद्रस्थानी होती. या पार्श्वभूमीवर नीट पेपरफुट प्रकरणी एनटीएने 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच, गैरव्यवहार आणि पेपरफुटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एनटीएच्या प्रशासकीय आणि कार्यकारी रचनेची व्यापक पुनर्रचना करण्यात येत असून, येत्या एका महिन्याच्या आत संस्थेची संपूर्ण कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि अंतर्गत व्यवस्थापन नव्याने उभारण्यात येणार आहे. देशातील स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.परीक्षा प्रक्रियेत झालेल्या त्रुटींचे एक प्रमुख कारण म्हणून सुरक्षा मानकांकडे झालेली दुर्लक्ष आणि बाह्य संस्थांवर वाढलेले अवलंबित्व समोर आले आहे. यामुळे तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार, एनटीएकडून खासगी संस्था आणि विक्रेत्यांना काम देण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्यात येणार असून, त्यांच्या निवडीसाठी अधिक कठोर आणि पारदर्शक निकष लागू केले जाणार आहेत.
एनटीएचे पुनर्गठन करताना भविष्यात कोणत्याही प्रकारचा पेपरफुट होऊ नये, यासाठी 'लीक-प्रूफ' परीक्षा प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सक्षम मनुष्यबळाच्या मदतीने बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली जाणार आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला मुळीच सहन केले जाणार नाही. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी आगामी काळात आणखी कठोर सुधारणा राबविण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी