
नवी दिल्ली, 24 जुलै (हिं.स.) - भारत आणि रोमानिया यांच्यात ऊर्जा सुरक्षा आणि हरित ऊर्जेकडे संक्रमण करण्याच्या क्षेत्रात, सहकार्यासाठी मोठा वाव आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. आज (24 जुलै 2026) बुखारेस्ट इथे भारत–रोमानिया उद्योग मंचाला संबोधित केले. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निकुशोर दान, रोमानिया सरकारचे सदस्य, भारत आणि रोमानियातील उद्योगजगताचे प्रतिनिधी तसेच दोन्ही देशांच्या उद्योग संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
युरोपमध्ये, मोक्याच्या भौगोलिक स्थानी वसलेला, अत्यंत कुशल मनुष्यबळ, प्रगत औद्योगिक क्षमता आणि युरोपियन संघाशी मजबूत एकात्मता असलेला रोमानिया, भारताचा नैसर्गिक आणि महत्त्वाचा भागीदार आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. रोमानिया हा केवळ गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा देश नाही, तर,व्यापक युरोपीय बाजारपेठेचे ते प्रवेशद्वारही असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्योग व्यवसाय मंचामध्ये भारतीय उद्योगजगताच्या मोठ्या शिष्टमंडळाचा सहभाग, रोमानियामध्ये उपलब्ध असलेल्या संधींवरील भारतीय उद्योगांचा वाढता विश्वास आणि रोमानियातील उद्योगांशी दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्याविषयीची उत्सुकता दर्शवणारा आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
भारत आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. 'विकसित भारत 2047' या आपल्या संकल्पनेचा उद्देश, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे हा आहे. या प्रवासात आंतरराष्ट्रीय भागीदारी, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत, असे त्या पुढे म्हणाल्या.
देशाची करप्रणाली सुलभ करणे आणि उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजना, यांसारख्या उपक्रमांद्वारे देशात पारदर्शक, निश्चित आणि गुंतवणूक स्नेही व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, रसायने आणि खते उद्योगात, रोमानियाच्या क्षमता बघता, या क्षेत्रातही सहकार्याला वाव आहे. भारतातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना आज जगभर वेगळी ओळख मिळाली असून, भारतात भरभराटीला येत असलेली स्टार्ट-अप व्यवस्था आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील रोमानियाच्या सामर्थ्याला पूरक ठरू शकते. बंदरे, रेल्वे, महामार्ग, लॉजिस्टिक्स पार्क आणि बहुविध वाहतूक व्यवस्थेसह परिवहन व लॉजिस्टिक्स क्षेत्रातही दोन्ही देशांतील कंपन्यांना सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच औषधनिर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रांतील सहकार्यही अधिक दृढ करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
भारत आणि रोमानियाचे उद्योग समुदाय, या उदयोन्मुख संधींचा लाभ घेतील आणि त्यातून एक यशस्वी व्यावसायिक भागीदारी निर्माण करतील, असा विश्वास, राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. रोमानियाच्या कंपन्यांनी भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या उद्योग व्यवसायातून, एक लवचिक पुरवठा साखळी निर्माण होईल, रोजगार निर्मिती होईल, नवोन्मेषाला चालना मिळेल आणि दोन्ही देशांतील लोकांसाठी शाश्वत समृद्धी निर्माण करता येईल, अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी