
नवी दिल्ली , 24 जुलै (हिं.स.)।लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) त्या सल्लागार सूचनेवर (अॅडव्हायजरी) तीव्र टीका केली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्याने विद्यापीठावर विद्यार्थ्यांना त्यांच्या लोकशाही हक्कांचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
दिल्ली विद्यापीठाच्या अॅडव्हायजरीवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “विद्यार्थ्यांना त्यांच्या लोकशाही हक्कांचा वापर केल्याबद्दल धमकावण्याचे धाडस तुम्ही कसे करू शकता? हे लक्षात ठेवा, योग्य वेळी तुम्हालाच याचे उत्तर द्यावे लागेल.”
दिल्ली विद्यापीठाने जारी केलेल्या सुरक्षा सल्लागार सूचनेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कथित नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे होणाऱ्या बेकायदेशीर सभा किंवा आंदोलनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. अॅडव्हायजरीमध्ये विद्यापीठाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जंतर-मंतर येथील आंदोलने आणि निदर्शने कडक नियंत्रणाखाली असतात. तसेच, बेकायदेशीर सभा किंवा आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
याशिवाय, अशा प्रकारच्या कृतींमुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असे विद्यापीठाने नमूद केले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरपासून दूर राहून स्वतःची सुरक्षा आणि कायद्याचे पालन यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहण्याचाही सल्ला दिला आहे. परिस्थिती चिघळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट आणि भ्रामक माहिती तयार करून प्रसारित केली जात असल्याचे विद्यापीठाने म्हटले असून, कोणतीही माहिती सत्यता पडताळून न पाहता तिच्यावर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांची ही टीका अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा त्यांनी एक दिवस आधी ‘इंडिया’ आघाडीतील इतर नेत्यांसह कथित नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गांधी स्मृतीपर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता.विरोधकांच्या म्हणण्यानुसार, या मोर्च्याचा उद्देश या वादानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहणे तसेच आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींप्रती ऐक्य आणि समर्थन व्यक्त करणे हा होता.
गुरुवारी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांशी अमानुष वर्तन केल्याचा आरोप केला होता आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी दिल्ली पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode