
एडिनबर्ग, 24 जुलै (हिं.स.)। स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथील हायड्रो एरिनामध्ये रंग, रोषणाई, संगीत आणि सांस्कृतिक वारशाच्या अप्रतिम संगमात कॉमनवेल्थ गेम्स 2026 चा भव्य शुभारंभ झाला. पारंपरिक स्कॉटिश संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट संगमाने उद्घाटन समारंभ अविस्मरणीय ठरला. हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये कलाकारांच्या मनमोहक सादरीकरणांनी, आकर्षक दृश्य प्रभावांनी आणि खेळाडूंच्या शानदार संचलनाने या क्रीडा महाकुंभाची दमदार सुरुवात झाली.
समारंभाची सुरुवात स्कॉटलंडच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवून झाली. देशातील महान खेळाडूंमध्ये गणले जाणारे दिग्गज ट्रॅक सायकलपटू सर ख्रिस होय आणि प्रसिद्ध अभिनेते ग्रेग मॅकह्यू हे लोकप्रिय ब्रिटिश विज्ञान-काल्पनिक मालिका डॉक्टर हू मधील प्रसिद्ध टार्डिस बॉक्समधून मंचावर दाखल झाले. यावेळी किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांच्या उपस्थितीमुळे समारंभाची शोभा आणखी वाढली. यावेळी टार्डिसला स्कॉटलंडची कथा आणि वारसा जगापर्यंत पोहोचविण्याचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आले.
यानंतर संगीत, नृत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा असा संगम पाहायला मिळाला, ज्याने संपूर्ण एरिना मंत्रमुग्ध झाला. स्कॉटिश इलेक्ट्रॉनिक फोक संगीतकार वाल्टोस यांच्या धूनवर तयार करण्यात आलेल्या विशेष साउंडट्रॅकच्या पार्श्वभूमीवर 74 राष्ट्रकुल क्रीडा संघटनांचे खेळाडू एकामागून एक एरिनामध्ये प्रवेश करत गेले. एलईडी स्क्रीनवर प्रत्येक पथकाची ओळख करून देण्यात आली, तर स्कॉटलंडच्या नैसर्गिक वनस्पतींपासून प्रेरित रंगीबेरंगी एनिमेशनद्वारे राष्ट्रकुल बॅटनचे जिवंत स्वरूप सादर करण्यात आले.
यजमान स्कॉटलंडचे पथक सर्वांत शेवटी मैदानात उतरले आणि स्थानिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले. खेळाडूंच्या संचलनाने संपूर्ण समारंभातील सर्वांत भावनिक आणि आकर्षक क्षण साकारला, जिथे क्रीडाभावना, एकता आणि राष्ट्रकुल कुटुंबातील विविधता स्पष्टपणे दिसून आली.
उद्घाटन समारंभात स्कॉटलंडच्या लोककथा आणि इतिहासालाही आधुनिक शैलीत मंचावर सादर करण्यात आले. प्रसिद्ध लोच नेस मॉन्स्टरच्या कथांपासून ते ग्लास्गोची ओळख मानल्या जाणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ टाइम’ घड्याळापर्यंत प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांना स्कॉटलंडच्या सांस्कृतिक प्रवासाची ओळख करून दिली. गायक नाथन इव्हान्स यांच्या जोशपूर्ण सादरीकरणासह, ग्लास्गो सेंट्रल स्टेशनवर आधारित रंगारंग नृत्य आणि शहराच्या जहाजबांधणी, वस्त्रोद्योग, रेल्वे इंजिने तसेच वाफेच्या इंजिनांच्या ऐतिहासिक वारशाचेही शानदार सादरीकरण करण्यात आले.
प्रसिद्ध गायक कॅलम बीटी यांनी लोकप्रिय गीत ‘यस सर, आय कॅन बूगी’ सादर करून प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले, तर गायिका नीना नेसबिट यांनी 1988 मधील गाजलेले स्कॉटिश गीत ‘आय एम गोना बी (500 माइल्स)’ आपल्या भावपूर्ण आवाजात सादर करून संपूर्ण वातावरण भावूक केले. समारंभादरम्यान कॉमनवेल्थ स्पोर्टचे अध्यक्ष डोनाल्ड रुकारे आणि ग्लास्गो 2026 चे अध्यक्ष जॉर्ज ब्लॅक यांनी सांगितले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या केवळ खेळाडूंसाठी नसून संपूर्ण जगातील लोकांसाठी आहेत आणि खेळांच्या माध्यमातून देश व संस्कृतींना एका सूत्रात बांधणे हा त्यांचा उद्देश आहे.
शेवटी किंग चार्ल्स यांनी अधिकृतपणे कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे उद्घाटन जाहीर केले. यासह 23 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या बहुक्रीडा स्पर्धेला औपचारिक सुरुवात झाली असून, राष्ट्रकुलातील देशांतील हजारो खेळाडू पदकांसाठी आपले आव्हान सादर करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule