
नवी दिल्ली , 24 जुलै (हिं.स.)। इस्रायलमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकाचा मृतदेह जेरुसलेममधील कटामोन परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आढळून आला आहे. स्थानिक माध्यमांनी पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घराच्या फरशीवर पडलेल्या अवस्थेत सापडला असून त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रक्त पसरलेले होते.
मोरियाह पोलीस ठाण्याचे प्रमुख युवल रूवेन यांनी सांगितले की, पोलिसांना पीडिताचा मृतदेह घरात आढळला आणि त्याच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले होते. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायली अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला असून प्राथमिक तपासातून गुन्हेगारी स्वरूपाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात हत्येचा संशय असल्याने पोलिसांनी दक्षिणेकडील इलात शहरातील ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत इस्रायलमध्ये सुमारे ३२,००० भारतीय कामगार कार्यरत होते. यापैकी जवळपास १२,००० भारतीय ऑक्टोबर २०२३ नंतर इस्रायलमध्ये पोहोचले आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार, २०२४ मध्ये ६,३६५ भारतीय कामगार इस्रायलमध्ये गेले, तर उर्वरित कामगार खासगी माध्यमांतून तेथे पोहोचले. फेब्रुवारीमध्ये भारत आणि इस्रायल यांनी पुढील पाच वर्षांत आणखी ५०,००० भारतीय कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शवली होती.
हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. दोन्ही नेत्यांनी इस्रायलमधील भारतीय कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले होते. इस्रायलमध्ये भारतीय कामगार प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र आणि काळजीवाहू (केअरगिव्हर) सेवांमध्ये कार्यरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode