
नवी दिल्ली , 24 जुलै (हिं.स.)।जबरदस्तीच्या मजुरीतून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या आयातीवर कारवाई करत अमेरिकेने भारतासह १७ देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (यूएसटीआर) जेमिसन ग्रीअर यांनी शुक्रवारी १९७४ च्या ट्रेड ॲक्टच्या कलम ३०१ अंतर्गत ६० देशांवर नव्या शुल्कांची घोषणा केली. सर्व देशांवर लागू करण्यात आलेल्या अतिरिक्त १० टक्के शुल्काची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला. यूएसटीआरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार जेमिसन ग्रीअर यांनी अशा ६० अर्थव्यवस्थांविरुद्ध अंतिम कारवाई केली आहे, ज्यांनी जबरदस्तीच्या मजुरीतून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या आयातीवर प्रभावी निर्बंध घालण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात अपयश दाखवले आहे.ग्रीअर म्हणाले, “हा निर्णय मानवी हक्कांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी आणि जागतिक व्यापारातील विकृती दूर करण्यासाठी घेण्यात आला आहे. यामुळे जगभरातील कामगारांच्या हितांचे अधिक प्रभावीपणे संरक्षण करता येईल.”
भारत, कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यासह एकूण १७ देशांवर १० टक्के शुल्क लागू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या प्रस्तावित यादीमध्ये भारताचा समावेश १२.५ टक्के शुल्क असलेल्या देशांच्या गटात करण्यात आला होता.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या फेडरल नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे की, जून महिन्यात प्रस्तावित शुल्काची घोषणा झाल्यानंतर भारताने जबरदस्तीच्या मजुरीतून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ जून रोजी भारताने आपल्या परराष्ट्र व्यापार धोरणात सुधारणा करून अशा वस्तूंच्या आयातीवर बंदी लागू केली.
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने या दोन्ही चौकशा अशा वेळी सुरू केल्या होत्या, जेव्हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात मागील वर्षी लागू करण्यात आलेले ‘परस्पर शुल्क’ आपत्कालीन अधिकारांचा वापर करून लादल्यामुळे ते बेकायदेशीर ठरवले होते. यानंतर ट्रम्प प्रशासनाने सर्व देशांवर १० टक्के शुल्क लागू केले होते. या शुल्काची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode