पेपरफुटी प्रकरणावर शिवाजी पार्कात तरुणाईच आंदोलन
मुंबई, 24 जुलै (हिं.स.)। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शुक्रवारी पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर तरुणाई एकवटली. विद्यार्थी, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस
Youth Protest Shivaji Park Over Paper Leak Issue


Youth Protest Shivaji Park Over Paper Leak Issue


मुंबई, 24 जुलै (हिं.स.)। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शुक्रवारी पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर तरुणाई एकवटली. विद्यार्थी, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी हातात तिरंगा घेत राष्ट्रगीत गायन करत सरकारविरोधात शांततापूर्ण पण ठाम भूमिका मांडली. या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी तसेच अभिनेते अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या फोनवरून अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधला. दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपके यांनी मुंबईतील तरुणांशी संवाद साधताना पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन तीन प्रमुख मागण्या मांडल्या असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी आणि सीजेपी ठाम आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांनी, राजीनामा मिळवूनच व्यवस्था बदलायची आहे. हा नवा भारत आहे, झुकणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित तरुणांना संबोधित करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या चार दिवसांत आपण याच ठिकाणी दुसऱ्यांदा भेटत आहोत. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, हीच आपली खरी ओळख आहे. भीती दाखवून राज्य करणाऱ्यांनी आजचे हे दृश्य पाहणे आवश्यक आहे. ही जनतेची हाक आता दिल्लीला ऐकावीच लागेल, असे ते म्हणाले. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. सरकारच्या हातात लाठी आणि बंदुका असतील, पण आमच्या हातात तिरंगा आहे. आता पाहू, तिरंगा जिंकतो की हुकूमशाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अमित ठाकरे यांनी आंदोलकांचे कौतुक करत, तुमचा आवाज आणि ताकद दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. तुम्ही जे करत आहात ते उत्तम आहे. सरकार बॅकफूटवर गेले असून देशभर या आंदोलनाची दखल घेतली जात आहे, असे म्हटले. तसेच, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून आम्ही येथे आलो आहोत. मी भाषण देण्यासाठी नाही, तर तुमच्या आंदोलनाचा अनुभव घेण्यासाठी आलो आहे. आता मी तुमच्यात उभा राहून राष्ट्रगीत म्हणणार आहे, असेही अमित ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले तरी आंदोलन संपलेले नाही. अभिजित दिपके आणि इतर युवक दिल्लीत लढा देत आहेत. मुंबईतील आवाज दिल्लीपर्यंत पोहोचलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत शांत बसायचे नाही, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांशी मैत्री होऊ शकते का, असा सवालही त्यांनी उपस्थित युवकांना केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande