
नवी दिल्ली, 25 जुलै (हिं.स.)। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ तब्बल २६ दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्यानंतर एक भावनिक व्हिडिओ प्रसिद्ध करत सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. उपोषण सोडल्यानंतर त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “२६ दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझ्या पवित्र आंदोलनाबद्दल प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
व्हिडिओमध्ये बोलताना सोनम वांगचुक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढताना त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. “मला विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शारीरिक झटापट करावी लागली, जमिनीवर झोपावे लागले आणि उपोषणाच्या २०व्या व २२व्या दिवशी स्वतःला सावरून पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्यासाठी माझ्यातील उरलेली सर्व शक्ती वापरावी लागली. या संपूर्ण काळात माझे ११ किलो वजन कमी झाले. लडाखच्या कडाक्याच्या थंडीतून दिल्लीच्या कडक उन्हात मी आंदोलन सुरू ठेवले. इतके सर्व करूनही माझ्या आंदोलनाची पवित्रता सिद्ध करण्यासाठी मला कोणाकडून चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उपोषण सोडल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी “तुम्ही उपोषण कोणासोबत सोडले?”, “केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीतच उपोषण का संपवले?”, “यामागे काही तडजोड झाली होती का?” असे प्रश्न उपस्थित केल्याचेही त्यांनी सांगितले. “कालपासून मी केवळ द्रव पदार्थ घेत आहे. त्यानंतर मला थोडी ऊर्जा मिळाली. सकाळपासून अनेकांचे फोन आणि संदेश येत आहेत. माझ्याविषयी विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. पण जर मला सरकारशी तडजोडच करायची असती, तर मी २६ दिवस उपाशी राहिलोच नसतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी समाजातील नकारात्मक मानसिकतेवरही तीव्र शब्दांत टीका केली. “जे लोक प्रत्येक आंदोलनामागे सौदा शोधतात, त्यांनी हे समजून घ्यावे की असे व्यवहार आलिशान खोल्यांमध्ये बसून होतात, उपोषण करून नाहीत. अशा नीच विचारांना खतपाणी घालणाऱ्या मानसिकतेची देशाला लाज वाटली पाहिजे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ सुरू केलेले त्यांचे उपोषण सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर २३ जुलै रोजी रात्री उशिरा संपले. मात्र, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule