
ग्लासगो, 25 जुलै (हिं.स.) । भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह केला. झंडू कुमारने पॅरा पॉवर पॅरालिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकून ग्लासगो येथे भारताच्या पदकतालिकेचे उद्घाटन केले. भारतीय खेळाडूंनी जलतरण, बॉक्सिंग आणि लॉन बाऊल्समध्येही चांगली कामगिरी केली.
पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकून झंडू कुमारने भारताला पहिले पदक मिळवून दिलले. या २८ वर्षीय खेळाडूने १८१ किलो आणि १९० किलो वजन यशस्वीरित्या उचलून १३०.९ गुण मिळवले.तो निर्णायक १९६ किलोचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. या स्पर्धेतील भारताचा दुसरा खेळाडू सुधीर होता, जो ११४.१ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला. नायजेरियाच्या इद्रिस रिलुवानने १३२.८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. मॅथ्यू हार्डिंगने १३१ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
अशोक मलिकचे पदक हुकले
पुरुषांच्या लाईटवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे पदक थोडक्यात हुकले. अशोक मलिक १४३.८ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. इंग्लंडच्या मार्क स्वानने १५३.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. नायजेरियाच्या रोलँड इझुरुइकेने रौप्यपदक, तर मलेशियाच्या बोनी बुन्याओ गुस्टिनने कांस्यपदक पटकावले. भारताचा परमजीत कुमार १३५.६ गुणांसह सातव्या स्थानी राहिला.
बुदिनीगिनालाही पदक मिळवण्यात अपयश
पुरुषांच्या १०० मीटर फ्रीस्टाइल एस१३ अंतिम फेरीत कार्तिक बुडिनीगिना चौथ्या स्थानी राहिल्याने भारत आणखी एक पदक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. बुडिनीगिनाने आपली फेरी ५७.५७ सेकंदात पूर्ण केली, तर त्याचा सहकारी इमाम अली १:०३.७३ वेळेसह सातव्या स्थानी राहिला.
जादुमणी सिंग उपांत्यपूर्व फेरीत दाखल
भारतीय बॉक्सर जादुमणी सिंगने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात विजयी सुरुवात केली. त्याने अंतिम ३२ च्या फेरीत स्कॉटलंडच्या ॲरॉन कलनला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जादुमणी सिंगला एकमताने विजेता घोषित करण्यात आले. आता त्याचा सामना पाकिस्तानच्या सुमामा रहमानशी होईल.
श्रीहरी नटराजचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात
श्रीहरी नटराजचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला. जलतरणात, या भारतीय जलतरणपटूने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सातवे स्थान पटकावले. नटराजने आपली हीट २५.२९ सेकंदात पूर्ण केली आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
लॉन बाऊल्समध्ये दमदार कामगिरी
लॉन बाऊल्समध्ये भारतासाठी हा आणखी एक प्रभावी दिवस होता. रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या महिला जोडीने आपला सलग दुसरा विजय नोंदवला. स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस हॉल ३ येथे झालेल्या सेक्शन बी सामन्यात या भारतीय जोडीने दक्षिण आफ्रिकेला २-० (६-४, ७-५) ने पराभूत केले.
भारताचा पदकतालिकेत पहिल्या १० मध्ये प्रवेश
एका पदकासह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पदकतालिकेत अव्वल १० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. एका कांस्य पदकासह भारताने ९ वे स्थान पटकावले आहे. एकूण १३ पदकांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण ७४ देशांनी सहभाग घेतला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे