
पालघर, 25 जुलै (हिं.स.)। मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना दैनंदिन कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा संकटाच्या काळातच आता जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील कासा आणि धुंदलवाडी परिसरात भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापन पद्धतीनुसार ३.१ इतकी नोंदविण्यात आली. काही क्षण जमीन हादरल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाचा धक्का स्पष्टपणे जाणवला असला तरी कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कासा-धुंदलवाडी परिसर हा गेल्या काही वर्षांपासून भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जात आहे. या भागात वेळोवेळी कमी-अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कायमच धास्तीचे वातावरण असते. आजचा धक्का देखील त्याच मालिकेतील आणखी एक हादरा मानला जात असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्यात २०१८ पासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. मागील आठ वर्षांत जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक लहान-मोठ्या तीव्रतेचे भूकंप नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. या भूकंपांमुळे आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसली तरी ग्रामीण भागातील अनेक घरांना तडे जाणे, भिंतींचे नुकसान होणे आणि किरकोळ स्वरूपाची हानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या मुसळधार पावसामुळे आधीच अनेक भागांतील नागरिक अडचणीत असताना त्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule