
नवी दिल्ली, 25 जुलै (हिं.स.) । भारताचे महान बुद्धिबळपटू आणि पाच वेळा विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युरोपियन युनियनच्या (ईयू) ताज्या निर्बंधांच्या यादीत रशियन बुद्धिबळपटू अर्काडी ड्वोरकोविच यांचा समावेश झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर, ईयू आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक आर्थिक आणि राजकीय निर्बंध लादले आहेत. ईयूने आता निर्बंधांचे २१ वे पॅकेज जारी केले असून, त्यात ४८ व्यक्ती आणि १७० संस्थांसह एकूण २१८ नवीन नावांचा समावेश आहे. युद्ध सुरू झाल्यापासूनची ही सर्वात मोठी निर्बंधांची यादी मानली जात आहे. या निर्बंधांनुसार, संबंधित व्यक्तींची मालमत्ता गोठवली जाऊ शकते. त्यांना आर्थिक मदत किंवा इतर संसाधने पुरवण्यास मनाई आहे. त्यांच्या प्रवासावरही निर्बंध लादले जाऊ शकतात.
निर्बंधांच्या यादीत समावेश झाल्यानंतर अर्काडी ड्वोरकोविच यांनी हा निर्णय बेकायदेशीर आणि चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की ते या निर्णयाला कायदेशीर आव्हान देतील आणि त्यांना खात्री आहे की अखेरीस त्यांना न्याय मिळेल. त्यांनी हे देखील मान्य केले की, जोपर्यंत या प्रकरणाचा कायदेशीर निपटारा होत नाही, तोपर्यंत त्यांच्यावरील निर्बंधांमुळे फिडेच्या कामकाजात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे, त्यांनी फिडे अध्यक्ष म्हणून आपले सर्व अधिकार आणि जबाबदाऱ्या तात्काळ प्रभावाने स्वेच्छेने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत युरोपियन युनियन आणि स्विस नियमांनुसार निर्बंध लागू राहतील, तोपर्यंत ते अध्यक्ष म्हणून काम करणार नाहीत.
फिडेच्या नियमांनुसार, अशा परिस्थितीत उप-अध्यक्ष अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारतात. या तरतुदीनुसार, विश्वनाथन आनंद यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता ड्वोरकोविच यांच्यावरील निर्बंध उठेपर्यंत किंवा परिस्थितीत बदल होईपर्यंत ते फिडेचे नेतृत्व करतील. फिडे परिषदेनेही ड्वोरकोविच यांच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत निर्बंध लागू राहतील, तोपर्यंत ड्वोरकोविच फिडे अध्यक्ष म्हणून कोणतेही अधिकार, जबाबदाऱ्या किंवा विशेषाधिकार वापरणार नाहीत. तसेच, ते संस्थेवर किंवा तिच्या मालमत्तेवर कोणतेही नियंत्रण ठेवणार नाहीत.
विश्वनाथन आनंद हे जगातील सर्वात यशस्वी बुद्धिबळपटूंपैकी एक मानले जातात. त्यांनी भारतात बुद्धिबळाला एक नवीन ओळख दिली आणि अनेक तरुण खेळाडूंना हा खेळ खेळण्यासाठी प्रेरित केले. ते २०२२ पासून फिडेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि आता त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात ड्वोरकोविच यांनी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फिडे अध्यक्षीय निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विश्वनाथन आनंद यांनी स्पष्ट केले आहे की ते अध्यक्षीय निवडणूक लढवणार नाहीत, तर त्याऐवजी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतील. फिडे अध्यक्षीय निवडणूक सप्टेंबरमध्ये उझबेकिस्तान येथे होणाऱ्या ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड दरम्यान होणाऱ्या आमसभेत घेतली जाईल. कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष तिमूर तुर्लोव्ह हे देखील अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. परिणामी, येत्या काही महिन्यांत फिडेच्या नेतृत्वाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे