


डोंबिवली, 26 जुलै (हिं.स.) - शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव चालू असतांना मृत्यूला समोरून भिडणाऱ्या जवानाच्या छातीवर झळकणारे शौर्यचक्र हे केवळ धातूचे पदक नसते; ते देशासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाची साक्ष असते. बाजारात विकत मिळणारे हे पदक नसून रणभूमीवर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ती अमूल्य पावती असते. शरीराच्या विविध भागांत तब्बल ११ गोळ्या लागून पाय निकामी झाले, पोटातही गोळ्या लागल्या; मात्र मृत्यूला हरवून परतलेल्या पॅरा कमांडो (निवृत्त) मधुसूदन सुर्वे यांनी डोंबिवलीकरांसमोर सांगितलेल्या रणभूमीवरील थरारक अनुभवांनी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे केले. 'देशाने आपल्याला काय दिले' असा प्रश्न विचारण्यापेक्षा देशाने आपल्याला भरपूर काही दिले आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचा आणि त्यागाचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे, असे प्रेरणादायी प्रतिपादन शौर्यचक्र सन्मानित पॅरा कमांडो सुर्वे यांनी केले.
नमस्ते शौर्य फाऊंडेशनच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवारी) डोंबिवली येथे 'ऑपरेशन कारगिल' आणि 'ऑपरेशन हिफाजत-मणिपूर' या मोहिमांतील प्रत्यक्ष अनुभव कथनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डोंबिवली भूषण पद्मश्री गजानन माने, माजी लष्करी जवान प्रवीण गमरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, निवृत्त लेफ्टनंट कमांडर सुनील कांबळे, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्गेश परुळकर, नमस्ते शौर्य फाऊंडेशनचे सर्वेसर्वा विलास सुतावणे आणि संयोजक कुणाल सुतावणे यांच्यासह शेकडो देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अमर जवान प्रतिमेचे पूजन आणि पुष्प अर्पण करून करण्यात आली. पेंढारकर महाविद्यालयाच्या एनसीसी पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. पॅरा कमांडो (निवृत्त) मधुसूदन सुर्वे यांचा अमर जवान प्रतिकृती, मानपत्र आणि स्नेहभेट देऊन सन्मान करण्यात आला.
पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी त्यांच्या अनुभव कथनात सांगितले की, आसाम, नागालॅंड, जम्मू-काश्मीर, कारगिल, दक्षिण आफ्रिकेतील काँगो आणि मणिपूर येथे विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. कारगिल युद्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी शत्रूशी लढा दिला. १९९९ मध्ये जवळपास १९ सहस्त्र फुटांवर झालेल्या कारगिल युद्धात आपल्याकडे अपुरी साधनसामग्री असतांनाही पाकिस्तानशी लढलो. त्यात बरेच जवान विकलांग झाले, तर अनेकांना वीरमरण प्राप्त झाले. खरेतर आपण १४ जुलै या दिवशीच कारगिलवर विजय मिळवला होता, मात्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदेशानुसार उर्वरित शत्रूंना देखील शोधून मारले, तो दिवस २६ जुलै होता. त्यानंतर २० जून २००५ यादिवशी मणिपूरमध्ये झालेल्या 'ऑपरेशन हिफाजत' दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत माझ्या शरीराच्या विविध भागांत ११ गोळ्या लागल्या. पाय निकामी झाले, तसेच पोटातही गोळ्या लागल्या. त्या रात्री मृत्यूच्या दाढेतून परतल्याचा अनुभव घेतला, असे त्यांनी सांगितले. या शौर्याबद्दल २६ जून २००६ या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मधुसूदन सुर्वे यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार असून, तो प्रत्येकाने पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येकाचे कर्तव्य - दुर्गेश परुळेकर
युद्धस्य कथा रम्या असे आपण अनेकदा ऐकतो. परंतु आज तेच प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्तीकडून ऐकताना तिन्ही दलांतील त्या जवानांप्रती कृतज्ञतापूर्वक अभिमान वाटतो. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालो, हे आपले भाग्यच आहे. क्षात्रतेज आणि क्षात्रधर्म हा आपल्या भगवतगीतेत सांगितला आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव हे जवान युद्धभूमीवर घेत असतात. त्याचे कठोर प्रशिक्षण दिल्याने त्यांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक तयारी झालेली असते. त्यामुळे ते त्याचे काटेकोरपणे पालन करतात. त्यांच्या मनातून भीती कायमची गेलेली असते. जवान अशा स्थितीत असतात की त्यांना आपल्या कुटुंबाचाही त्याग केलेला असतो. ते मोह-मायेत न अडकता युद्धभूमीवर तत्परतेने जातात. त्यांच्या या त्यागाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कारण ते तिथे सीमेवर आपला जीव धोक्यात घालून लढतात. म्हणून आपण इथे घरात सुरक्षित राहू शकतो. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचे स्मरण होते. कारण त्यांनीही आधी लगीन कोंढ्याण्याचे, नंतर रायबाचे, अशी शपथ घेतली होती. यातून हेच प्रकर्शाने दिसून येते की, ते राष्ट्रीय कर्तव्यापुढे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या गौण मानतात. असे जवान नेहमीच सन्मानित असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या संस्कृतीत पळपुटेपणा कधी शिकवला नाही. मात्र आपण अनेकदा सबबी सांगून एखाद्या गोष्टीतून अंग काढून घेतो. जवानांना लढा किंवा मरा, याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे त्यांना कायम मानाचा मुजरा.
मधुसूदन सुर्वे भारताचे आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - पद्मश्री गजानन माने
मधुसूदन सुर्वे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. मृत्यूच्या दाढेतून परत येऊनही देशसेवेची प्रेरणा देणाऱ्या अशा सैनिकांच्या शौर्याला सलाम केला पाहिजे. नमस्ते शौर्य फाऊंडेशनने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी