
नवी दिल्ली , 27 जुलै (हिं.स.)।कॅनडाच्या इमिग्रेशन प्राधिकरणाने भारतीय विद्यार्थ्यांचे वर्क परमिट नाकारल्याच्या बातम्यांनंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (आयआरसीसी) ने विद्यार्थ्यांनी शिक्षणादरम्यान नोकरीसंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट केले आहे. तसेच, परवानगीशिवाय काम केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामध्ये भविष्यात परवाने न मिळणे किंवा कॅनडातून हकालपट्टी होणे यांचा समावेश आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.
आयआरसीसी चे हे निवेदन कॅलगरी, कॅनडा येथील पोर्टेज कॉलेजने वर्क परमिट अर्ज नाकारल्यानंतर आंदोलन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कायदेशीर सल्ला घेण्याचा सल्ला दिल्यानंतर आले आहे. कॉलेजने सांगितले की, या प्रकरणाबाबत ते अद्यापही अधिकृत स्पष्टीकरण मागत आहेत. 21 जुलै रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, पोर्टेज कॉलेजने म्हटले की ते या विषयावर स्पष्टीकरण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवत आहेत आणि विद्यार्थ्यांना अचूक माहिती देण्यास तसेच नवीन माहिती उपलब्ध होताच त्यांना कळवण्यास कटिबद्ध आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील एका पोस्टमध्ये आयआरसीसीने विद्यार्थ्यांना स्मरण करून दिले की त्यांना केवळ त्यांच्या स्टडी परमिटमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट अटींनुसारच काम करण्याची परवानगी आहे. एजन्सीने स्पष्ट केले की परवानगीशिवाय काम करणे, अगदी अर्धवेळ (पार्ट-टाइम) असले तरी, इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन मानले जाऊ शकते.
आयआरसीसी ने विद्यार्थ्यांना परवानगीशिवाय काम केल्यास होणाऱ्या परिणामांबाबतची अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये दंडात्मक कारवाई, कॅनडामध्ये प्रवेशासाठी अपात्र ठरविणे किंवा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे.
शिक्षणादरम्यान काम करण्याचा विचार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती: तुम्ही कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून तेव्हाच काम करू शकता, जेव्हा तुमच्या स्टडी परमिटच्या अटींमध्ये त्यास परवानगी दिलेली असेल. जर तुम्ही कॅम्पसबाहेर काम करण्यासाठी पात्र असाल, तर वर्ग सुरू असताना तुम्ही आठवड्याला जास्तीत जास्त 24 तास काम करू शकता. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक काम करणे हे तुमच्या स्टडी परमिटच्या अटींचे उल्लंघन मानले जाते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
आयआरसीसी ने एका पोस्टमध्ये नमूद केले की, कॅनडातील एका कॉलेजने आंदोलन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे सुरक्षितपणे स्वतःकडे जतन करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode