सोलापुरात एलपीजी पुरवठा सुरळीत; नवीन गॅस कनेक्शनची नोंदणी मात्र अद्याप बंद
सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : सोलापूर शहरातील एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत झाला असून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण नियमितपणे सुरू आहे. मात्र, एप्रिल महिन्यापासून तात्पुरती स्थगित करण्यात आलेली नवीन घरगुती गॅस कनेक्शनची नोंदणी तीन महिने उलटूनही अ
gas


सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : सोलापूर शहरातील एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत झाला असून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण नियमितपणे सुरू आहे. मात्र, एप्रिल महिन्यापासून तात्पुरती स्थगित करण्यात आलेली नवीन घरगुती गॅस कनेक्शनची नोंदणी तीन महिने उलटूनही अद्याप सुरू झालेली नसल्याने नवीन ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

पश्चिम आशियातील इस्रायल-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी कनेक्शन देण्यावर तात्पुरती स्थगिती दिली होती. उपलब्ध गॅसचा पुरवठा विद्यमान ग्राहकांना प्राधान्याने मिळावा, या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, सध्या शहरातील गॅस वितरण व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली असून, गॅस एजन्सींच्या माहितीनुसार बुकिंगनंतर चार ते पाच दिवसांत घरपोच सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. तरीही नवीन कनेक्शन सुरू करण्याबाबत तेल कंपन्यांकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश प्राप्त झाले नसल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले.

यामुळे नवीन घरगुती गॅस कनेक्शनसाठी इच्छुक नागरिकांना गॅस एजन्सींच्या फेऱ्या माराव्या लागत असून, नोंदणी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande