रत्नागिरी : रत्नसेतू ॲपमध्ये २५ हजारांहून अधिक अर्ज निकाली
रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेले ‘मिशन जलद’ प्रभावी ठरत आहे. ‘रत्नसेतू ॲप’च्या माध्यमातून विविध पोलीस सेवा नागरिकांना पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या ऑनलाइन पद्ध
रत्नागिरी : रत्नसेतू ॲपमध्ये २५ हजारांहून अधिक अर्ज निकाली


रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेले ‘मिशन जलद’ प्रभावी ठरत आहे. ‘रत्नसेतू ॲप’च्या माध्यमातून विविध पोलीस सेवा नागरिकांना पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहेत.

१ मे २०२५ ते २६ जून २०२६ या कालावधीत २५ हजार ६१८ नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या सर्व अर्जांपैकी एकही अर्ज प्रलंबित ठेवण्यात आलेला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मिशन राबवण्यात येत आहे.

अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यःस्थिती वेळोवेळी समजावी यासाठी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणीसाठी विश्रुती कळंबटे, पासपोर्ट व ड्रोन परवान्यासाठी राजेंद्र फुटक आणि रुक्सार पटेल तर सशुल्क बंदोबस्तासाठी निशा केळकर हे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

नोकरीसाठी आवश्यक असलेल्या वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. खासगी तसेच निमशासकीय संस्थांमधील नोकरीसाठी आवश्यक असलेली ही प्रमाणपत्रे २२ हजार ३८४ नागरिकांना देण्यात आली आहेत. सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी ध्वनिक्षेपक परवान्यांचे २ हजार ९१४ अर्ज मंजूर करण्यात आले. याशिवाय राजकीय, सामाजिक सभा, संमेलने, मिरवणुका आणि शोभायात्रांसाठी १३१ आयोजकांना ऑनलाइन परवानगी देण्यात आली. परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक असलेले पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande