
अमरावती, ३ जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकतींची छाननी पूर्ण झाली असून ६९ ग्रामपंचायतींसंदर्भात एकूण ११३ दावे व हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २९ हरकती ग्राह्य धरत संबंधित ग्रामपंचायतींच्या आरक्षणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व ४९८ ग्रामपंचायतींच्या अंतिम आरक्षण यादीकडे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मागील महिन्यात ग्रामसभा घेऊन प्रारूप आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर जिल्हाभरातून ११३ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यातील २९ ग्रामपंचायतींसंदर्भातील हरकती मान्य करून आवश्यक बदल करण्यात आले, तर उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.
प्रशासनाच्या नियोजनानुसार, दुरुस्ती झालेल्या २९ ग्रामपंचायतींची अंतिम आरक्षण यादी १३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर उर्वरित ४६९ ग्रामपंचायतींची अंतिम आरक्षण यादी १० जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.
अंतिम आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागनिहाय तयारी आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात राजकीय हालचालींना वेग आला असून अंतिम आरक्षणानंतर अनेक इच्छुकांचे राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.
१३ जुलै रोजी अंतिम आरक्षण जाहीर
होणाऱ्या ग्रामपंचायती
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट; चांदूर बाजार तालुक्यातील पिपरी थुगाव; कारंजा बहिरम तालुक्यातील फुबगाव व कुरळपूर्णा; चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी; अमरावती तालुक्यातील शिराळा; अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगाव, अडगाव खाडे, कसबे गव्हाण; धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा, देवगाव, उसळगव्हाण, बोरवघळ, रायपूर (का.), बोरगाव धांदे, सोनेगाव, काशीखेड, जळका पटाचे, निभोरा राज आणि आजनगाव; तसेच वरुड तालुक्यातील टेंभुरखेडा, पुसला, लोणी, बेनोडा, काचुर्णा, वघाळ, सावंगी आणि इत्तमगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी