लातूरमध्ये विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमची दमदार सुरुवात
लातूर, 03 जुलै (हिं.स.)।मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकत्र आणून परस्पर सहकार्य, व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विश्वमंगल मराठी फाउंडेशन आयोजित विश्वमंगल मराठी बिझनेस फो
मराठी उद्योजक


लातूर, 03 जुलै (हिं.स.)।मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकत्र आणून परस्पर सहकार्य, व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विश्वमंगल मराठी फाउंडेशन आयोजित विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम – लातूरचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. लोकल टू ग्लोबल- ग्लोबल टू लोकल या संकल्पनेतून मराठी उद्योजकांचे सक्षम व्यावसायिक जाळे उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेची उद्दिष्टे, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रमांची माहिती दिली. ज्ञानमंदिर सुधारणा अभियान, मराठी भाषा व संस्कृतीचा प्रचार-प्रसार, कृषी क्षेत्राला पाठबळ तसेच उद्योग विभागाच्या माध्यमातून उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

यानंतर अतुल मुळे यांनी लातूर बिझनेस फोरमच्या स्थापनेमागील संकल्पना आणि अल्पावधीतच मिळालेल्या उद्योजकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची माहिती दिली. या व्यासपीठामुळे लातूरमधील उद्योजकांना एकमेकांशी जोडले जाऊन शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फाउंडेशनच्या बिझनेस फोरमचे प्रमुख भूषण कुलकर्णी यांनी फोरमची कार्यपद्धती आणि भविष्यातील दिशा स्पष्ट करताना, मराठी उद्योजकांनी परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येक सदस्य हा दुसऱ्या सदस्याच्या व्यवसायाचा ब्रँड ॲम्बेसेडर असेल, ही अभिनव संकल्पना त्यांनी मांडली.

व्यवसायासाठी अनेक सुविधा उपलब्ध

या फोरमच्या माध्यमातून सदस्यांना व्यवसाय नेटवर्किंग, ग्राहक संदर्भ (Business Referrals), नवीन व्यावसायिक संधी, कौशल्य विकास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण कार्यशाळा, उद्योजक मेळावे, गुंतवणूकदारांशी संवाद तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक संपर्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दहा बिझनेस फोरम उभारण्याचे काम सुरू असून त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी उद्योजकांचे नेटवर्क विस्तारण्याचा मानस असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

डिजिटल प्लॅटफॉर्मची सुविधा

सर्व बिझनेस फोरमना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडण्यासाठी अत्याधुनिक बिझनेस अॅप्लिकेशन विकसित करण्यात येत असून, त्याद्वारे सदस्यांना व्यवसाय संपर्क, माहितीची देवाणघेवाण आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार आहेत. तसेच परदेशातील मराठी उद्योजकांना स्थानिक उद्योजकांशी जोडून जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला करण्यावरही भर दिला जाणार आहे.

यशस्वी उद्योजकांसाठी परदेशी अभ्यास दौरे, उद्योग भेटी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचाही मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

संवादातून व्यावसायिक सहकार्याला चालना

कार्यक्रमात उपस्थित उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची ओळख करून देत अनुभव, अपेक्षा आणि सूचना मांडल्या. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामुळे सदस्यांमध्ये परस्पर ओळखी वाढल्या आणि भविष्यातील व्यावसायिक सहकार्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

यावेळी भूषण कुलकर्णी, विजय पाटील, बॉबी मेनन, अतुल मुळे, संतोष देशमुख, प्रविण पोंदे, विनोद पांढरे, यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande