छ.संभाजीनगर - ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी ‘अमृत’ करणार मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक,
छ.संभाजीनगर - ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी ‘अमृत’ करणार मार्गदर्शन


छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.)।

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई घटक तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायातील संधी:- ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही संबंधित तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल व्यवसाय तसेच ग्रामीण भागामध्ये चार्जिंग हब उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ईव्ही क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्रांपैकी एक ठरणार असल्याने प्रशिक्षित उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे.

उपक्रमाचे वैशिष्ट्य:- अमृतच्या या विशेष उपक्रमांतर्गत सहभागी लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या क्षेत्रातील भारतीय स्वदेशी कंपन्या आणि तज्ञ मार्गदर्शक यांच्या सहाय्याने हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. याशिवाय अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.

पात्रता व अटी:- या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक पात्र राहतील. अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या पात्रता व अटी लागू राहतील.

रोजगार संधीः- ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाबरोबरच ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, इलेक्ट्रिकल देखभाल, तांत्रिक सेवा, ग्रीन एनर्जी प्रकल्प, ईव्ही उपकरण विक्री व सेवा, तसेच उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्ये रोजगार व करिअरच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. ग्रामीण भागातील युवकांसाठीही हा व्यवसाय उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो.

स्वयंरोजगारासाठी विशेष सहाय्य:- स्वतःचा अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना अमृतकडून आवश्यक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला, मदत तसेच अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे नवोदित उद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी विशेष मदत मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:- अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अमृत संस्थेच्या mahaamrut.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन, ‘योजना’ या विभागात, विशेष योजना या मेनू खाली EV charging Station Partner मध्ये ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक आणि कार्यालयाचा पत्ता व इतर तपशील दिलेला आहे.

अधिक माहिती संपर्क:-

पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९

जिल्हा व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा :- ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६

https://mahaamrut.org.in/coordinators-

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande