
अमरावती, 03 जुलै, (हिं.स.)। ३० जूनपासून जिल्ह्यात शाळाप्रवेशोत्सवाने नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजल्या, नवागत विद्यार्थ्यांनी नव्या स्वप्नांसह वर्गात प्रवेश केला. मात्र, अमरावती जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शिक्षकाविना शाळांत विद्यार्थी अशी स्थिती बघायला मिळत आहे.
पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे सुरुवातीचे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच काळात शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधून, गाणी, गोष्टी, खेळ आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यात शाळेची गोडी निर्माण करतात. मात्र, यंदा अनेक शाळांमध्ये ही भूमिका पार पाडण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे शिक्षण विभागाने काही शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठविले आहे, तर दुसरीकडे निवडणूक विभागाने विशेष मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांना बीएलओची जबाबदारी दिली आहे. परिणामी अनेक शाळांमध्ये एक किंवा दोन शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी आली आहे. यातच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांनी १ ते १५ जुलैदरम्यान इयत्ता १ ते ८ साठी 'अंकतर्क समृद्धी' कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, शिक्षकच उपलब्ध नसताना हा उपक्रम प्रभावीपणे राबवायचा कसा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
अनेक शाळांमध्ये तीनपैकी दोन शिक्षक बीएलओच्या कामात असल्याने उर्वरित एकाच शिक्षकावर सर्व वर्गाचा भार येत आहे. काही एक शिक्षकी शाळांतील शिक्षकांनाही सकाळी शाळा घेऊन प्रशिक्षणाला जावे लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पहिल्या दिवसापासूनच परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पहिल्या वर्गापासून नाही तर दुसऱ्या वर्गापासून अंकसमृद्धी कार्यक्रम असल्याचे डायटचे प्राचार्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी