
पुणे, 03 जुलै (हिं.स.)।
भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांकडून मंजूर होणाऱ्या रु. २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, कस्टम हायरिंग सेंटर आदी कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी या योजनेचा लाभ घेता येतो.
वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट तसेच इतर पात्र संस्था या योजनेसाठी पात्र आहेत.
विशेष मोहिमेदरम्यान जनजागृती, शेतकरी मेळावे, कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत, अनुसूचित बँकेशी संपर्क साधून तसेच https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि संचालक, आत्मा, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु