आंबेनळी घाट चार दिवस पूर्ण बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रायगड, 03 जुलै (हिं.स.)। : अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) राज्य महामार्ग (SH-139) ६ जुलैपर्यंत या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जा
अंबोली


रायगड, 03 जुलै (हिं.स.)। : अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) राज्य महामार्ग (SH-139) ६ जुलैपर्यंत या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या अहवालात आंबेनळी घाट हा सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत संवेदनशील आणि भूस्खलनप्रवण मार्ग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तीव्र उतार, खोल दऱ्या, अस्थिर माती, हवामानामुळे कमकुवत झालेले बेसॉल्ट खडक, नैसर्गिक जलप्रवाह आणि दाट वनक्षेत्र यामुळे मुसळधार पावसाच्या काळात या घाटातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने या परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे भूस्खलन, दरड कोसळणे, मोठे दगड रस्त्यावर येणे, रस्ता खचणे, वृक्ष उन्मळून पडणे तसेच दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घाट पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वीही प्रतिकूल हवामानामुळे आंबेनळी घाटात दरडी कोसळणे, वृक्ष पडणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत घाटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यात यश आल्याचा अनुभव प्रशासनाने नोंदविला आहे.

दरम्यान, तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलादपूर यांनीही ६ जुलैपर्यंत घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची शिफारस केली होती. तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी अवजड वाहनांसह ऑरेंज आणि रेड अॅलर्टच्या कालावधीत हलक्या वाहनांनाही प्रवेश बंद ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande