
अमरावती, ३ जुलै (हिं.स.) : बलात्कार, मारहाण, धमकी आणि ब्लॅकमेलिंगसह गंभीर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झालेले चांदूर बाजार तहसील कार्यालयातील आसेगावचे ग्राम महसूल अधिकारी विपुल भानुदास ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
एकता उर्फ खुशबू रोशन साहू (रा. पार्वती नगर क्र. १, अमरावती) यांनी १९ मे २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात विपुल ठाकरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत बलात्कार, मारहाण, शिवीगाळ व धमकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला धमकावणे, मारहाण करणे, जबरदस्ती करणे, ब्लॅकमेल करणे तसेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या आरोपांची न्यायालयीन किंवा अंतिम चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या प्रकरणाला प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाल्यामुळे महसूल विभागाची प्रतिमा आणि शासनावरील जनतेचा विश्वास बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित अधिकारी सेवेत कायम राहिल्यास साक्षीदारांवर प्रभाव टाकणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणे किंवा चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी नोटिशीला कोणतेही स्पष्टीकरण सादर केले नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४(१)(क) अन्वये करण्यात आलेल्या या कारवाईनुसार पुढील आदेशापर्यंत विपुल ठाकरे निलंबित राहतील. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय येथे निश्चित करण्यात आले असून तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निलंबनाच्या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसून निर्वाह भत्ता स्वीकारताना आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी