
लातूर, 03 जुलै (हिं.स.)।
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. देवणी तालुक्यातील वलांडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत ४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत शेतातून पळ काढला. त्याचा शोध सुरू असून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलांडी परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीदाराकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मारुती सुझुकी सेलेरिओ (MH-04-KL-1372) या कारमधून विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वलांडी–दवणहिप्परगा मार्गावर सापळा रचण्यात आला.
संशयित कार दिसताच पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेत शेतात पळ काढला.
वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, आर.एम.डी. पान मसाला आणि एम. सेंटेड गोल्ड तंबाखू असा महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला १ लाख २० हजार ३२० रुपयांचा गुटखा आढळून आला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख ५० हजार रुपयांची मारुती सुझुकी सेलेरिओ कार आणि एक मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अन्वये देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार मनोज खोसे, रियाज सौदागर, साहेबराव हाके आणि प्रविण कोळसुरे यांच्या पथकाने केली.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रतिबंधित गुटखा, मादक पदार्थ, अवैध धंदे आणि जनआरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध यापुढेही सातत्याने धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis