
रायगड, 03 जुलै (हिं.स.)। प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक व विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर अलिबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹1,31,361 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 2 जुलै 2026 रोजी दुपारी 2.20 वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगम, पो. खंडाळे येथे आरोपी हा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता ₹1,31,361 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
सदर प्रतिबंधित अन्नपदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असूनही आरोपीने बेकायदेशीररीत्या त्यांची साठवणूक व विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपीला 2 जुलै 2026 रोजी रात्री 10.44 वाजता अटक करण्यात आली.
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 105/2026 दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006, त्याअंतर्गत नियम 2011 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)