
अमरावती, ३ जुलै (हिं.स.) : महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देविदासराव जाधव (वय ५१) यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २० अंतर्गत सुतगिरणी प्रभागातील सामरानगर येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, इतर अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत प्रभागाची पाहणी सुरू होती. त्यावेळी नगरसेवक संजय गव्हाळे यांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमक्ष शिवीगाळ करत शहाणपणा करू नका असे म्हणत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर डॉ. जाधव यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांन्वये नगरसेवक संजय गव्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नगरसेवक संजय गव्हाळे यांनी आरोप फेटाळून लावले. जनतेच्या कामांसाठी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधावा लागतो. मात्र अधिकारी फोन उचलत नाहीत आणि सहकार्य करत नाहीत. नागरिकांच्या समस्या मांडताना मी केवळ माझे नगरसेवक म्हणून कर्तव्य बजावत होतो. काही लोकांना माझे काम आणि जनसंपर्क सहन होत नसल्याने माझे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. डॉ. जाधव यांच्याविरोधात मी यापूर्वी लेखी तक्रारही केल्याचे गव्हाळे यांनी सांगितले
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी