
परभणी, 03 जुलै (हिं.स.)। प्रत्येक वेळी तुला मुलगीच का होते?, तुला स्वयंपाक येत नाही, कामधंदा येत नाही अशा कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जांब (ता. परभणी) येथे घडली असून पाथरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अंजली अंबादास शिंदे (रा. जांब, ता. परभणी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह सन 2022 मध्ये जांब येथे झाला होता. विवाहानंतर काही काळ त्यांना चांगली वागणूक देण्यात आली. मात्र, त्यानंतर मुलगी जन्माला येणे, घरकाम व स्वयंपाक नीट न येणे या कारणांवरून सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जाऊ लागला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच तिला उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. विरोध केल्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पती अंबादास प्रभाकर शिंदे, सासरे प्रभाकर चिमाजी शिंदे, सासू निलावती प्रभाकर शिंदे, दीर मनोज प्रभाकर शिंदे आणि नणंद रेखा अनिल सूर्यवंशी (सर्व रा. जांब) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis