
नाशिक, 03 जुलै (हिं.स.)।
: शहरातील पावसाळी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या मान्सून टास्क फोर्स मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज भर पावसात पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ५ व ६ मध्ये विविध ठिकाणी भेट देत सुरू असलेल्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी दिंडोरी रस्ता, पेठ रस्ता तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसराला भेट देत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच मूलभूत सुविधा सुरळीत राहाव्यात या दृष्टीने जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर पेठ रस्ता परिसरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांची तपासणी करून कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यासोबतच मुसळधार पावसाच्या काळात शहरात पाणी तुंबणे किंवा जलनिस्सारण व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी विविध ठिकाणच्या मलनिस्सारण कूपांची तसेच पावसाळी गटार आणि भूमिगत जलनिस्सारण मार्गांची पाहणी करण्यात आली. भविष्यात अतिवृष्टीदरम्यान अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये स्थानिक ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरात वारंवार पावसाचे पाणी साचण्याच्या समस्या, त्यावरील संभाव्य पर्यायी उपाययोजना तसेच कायमस्वरूपी नियोजनाबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या सूचना आणि अडचणी लक्षात घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
या क्षेत्रीय पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, उपअभियंता नितीन राजपूत तसेच कनिष्ठ अभियंता सोमनाथ घोलप उपस्थित होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष कामांचा आढावा घेत कामांमध्ये अधिक गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, “पावसाळ्याच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, शहरातील पाणी निचरा व्यवस्था सक्षम राहावी आणि संभाव्य समस्या उद्भवण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना व्हाव्यात यासाठी महानगरपालिका प्रशासन क्षेत्रीय पातळीवर सातत्याने सक्रिय आहे. प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करत पावसाळी व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे ही सध्या सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV