
रत्नागिरी, 3 जुलै, (हिं.स.) । महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी, दि. ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईत सहकार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंटयेथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा समारंभ होईल.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सहकार चळवळीच्या विकासासाठी केलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांची गेल्या महिन्यातच राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी