
सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)।
देगाव स्मशानभूमीतील जीर्ण झालेल्या वेटिंग शेडच्या नूतनीकरणाच्या कामास अखेर सुरुवात झाली असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी पावसाळा, उन्हाळा आणि इतर प्रतिकूल हवामानात नागरिकांना उघड्यावर थांबावे लागत असल्याने वेटिंग शेडची मागणी होत होती.
प्रभाग क्रमांक ६ मधील या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश वानकर यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
कामाची पाहणी गणेश वानकर यांनी केली. यावेळी विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे कनिष्ठ अभियंते अजिंक्य विपत आणि अरुण जाधव उपस्थित होते. काम दर्जेदार, सुरक्षित आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
वेटिंग शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर अंत्यविधीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नातेवाईकांना सुरक्षित व संरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे. या कामामुळे स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत करत, सार्वजनिक सुविधांमध्ये अशा प्रकारच्या मूलभूत कामांना प्राधान्य दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड