
लातूर, 03 जुलै (हिं.स.)। शिक्षण हक्क कायदा (RTE) २००९ आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करून आपल्या शाळेतील काही शिक्षक खाजगी शिकवणी वर्ग चालवत असल्याचा आरोप 'कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र' (अहमदपूर शाखा) या संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापक यांच्यासह शहरातील सर्व शाळांना अधिकृत निवेदन देण्यात आले असून, हे खाजगी वर्ग त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या कलम २८ नुसार, कोणत्याही शिक्षकाला खाजगी शिकवणी किंवा खाजगी शिक्षण उपक्रम चालवण्यास सक्त मनाई आहे. याव्यतिरिक्त, शासकीय कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेच्या नियमांनुसार, सेवेतील शिक्षकांकडून खाजगी शिकवणी चालवणे हे सेवाशर्तींचे उल्लंघन मानले जाते. यामुळे संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई, निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती संघटनेने निवेदनात दिली आहे.
अहमदपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनचे तालुका अध्यक्ष प्रा. भोंग आर.पी. यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्णवेळ खाजगी क्लासेस संचालकांचा व्यवसाय या प्रकारामुळे धोक्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संघटनेने प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, उच्च शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी (पंचायत समिती, अहमदपूर) तसेच शहरातील सर्व शाळांना या विषयाची प्रत पाठवून कारवाईची मागणी केली आहे. मुख्याध्यापकांनी या अर्जावर सकारात्मक विचार करून संबंधित शिक्षकांना खाजगी क्लासेस त्वरित बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा असोसिएशनच्या वतीने कायदेशीर मार्गाने आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis