
नांदेड, 03 जुलै (हिं.स.)।भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सखोल मतदारयादी पुनरीक्षण मोहीम सुरू झाली. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदाराचे गणनापत्र भरून घेण्याची प्रक्रिया ३० जूनपासून सुरू आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कौठा व विष्णूपुरी येथे भेट देत त्यांनी स्वतः मतदारांचे गणनापत्र भरून अॅपवर ऑनलाइन सादर केले.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डीले यांनी सर्व नागरिकांनी बीएलओंना अचूक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील २७ लाख ७७ हजार ७३ मतदारांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ८८ बीएलओ, ३१० बीएलओ पर्यवेक्षक, ९ मतदार नोंदणी अधिकारी आणि ९० सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी बीएलओ घरी आल्यावर भरलेले गणनापत्र काळजीपूर्वक तपासावे. आवश्यक दुरुस्त्या असल्यास त्या नोंदवाव्या. दोन्ही प्रतींतर स्वाक्षरी करून ती अद्ययावत छायाचित्रासह संबंधित बीएलओकडे गणनापत्र जमा करावी लागणार.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis