
पुणे, 03 जुलै (हिं.स.) : जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी होत असल्याचे सकारात्मक संकेत आहेत, मात्र जुन्या चालीरीती व अंधश्रद्धा पूर्णपणे दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी व्यक्त केले.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठीत विभागीय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला समितीच्या सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, पुणे जिल्ह्याचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
शीतल तेली-उगले यांनी सांगितले की, या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचवता येऊ शकतो. विशेषतः आदिवासी भागातील शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करावेत, असे त्यांनी नमूद केले.
तसेच विविध भागांतील गुन्ह्यांचा सखोल अभ्यास करून सेवाभावी संस्था व बिगर शासकीय संस्थांचा सहभाग वाढवावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका नियमितपणे घेणे आवश्यक असून सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत या कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, उपलब्ध अनुदान व गुन्ह्यांची संख्या यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु