
अमरावती, 03 जुलै (हिं.स.)
तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काही मोजक्याच ग्रामपंचायतींमध्ये २५ ते ३० गॅबियन बंधाऱ्यांची खैरात वाटून शासकीय निधीचा अपहार करण्यासाठी निकृष्ट कामे केल्याचे वृत्त प्रकाशित करताच राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या वृत्ताची तत्काळ गंभीर दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी थेट प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी चिखलदराच्या तहसीलदारांना अधिकृत पत्र पाठवून या सर्व संशयास्पद कामांची 'उलट-टपाली' संपूर्ण कुंडलीच मागवून घेतली आहे.
प्रशासकीय यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या संगनमताने मजुरांऐवजी केवळ कागदोपत्री हजेरी दाखवून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे तब्बल २३५ गॅबियन व सिमेंट नाला बांध (सीएनबी) उभारण्यात आले. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागामध्ये अभियंता कार्यरत नसताना झालेली ही कामे लोकमतने उघडकीस आणली होती. आमदार बच्चू कडू यांनी या सर्व कामांची पारदर्शकता तपासण्यासाठी १२ प्रमुख मुद्द्याची माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, असे पत्र दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी