सत्तेत नसलो तरी कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार - नताशा आव्हाड
Even if we are not in power, we will fight on the streets for the workers,' Natasha Awhad
Even if we are not in power


येवला तालुका दौरा: मुक्तीभूमीला भेट अन् शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पेरणीचा घेतला अनुभव

येवला, 03 जुलै (हिं.स.)।

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सध्या आपण सत्तेत नसलो, तरी जेव्हा जेव्हा स्थानिक प्रश्नांवर आंदोलन करण्याची वेळ येईल, तेव्हा मी ठाण्यावरून थेट येवल्याला येईल आणि तुमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व नाशिक जिल्हा प्रभारी नताशा जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना दिला.

येवला तालुका युवक पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद दौऱ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पक्ष संघटना बांधणी आणि स्थानिक प्रश्नांवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

नताशा आव्हाड यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केलेल्या पवित्र मुक्तीभूमी स्थळाला भेट देऊन केली. तेथे त्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले.

यानंतर, शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीची आणि व्यथांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. सध्या तालुक्यात पेरणीचे दिवस सुरू असल्याने, त्यांनी स्वतः शेतात उतरून मका टाकण्याचा (पेरणीचा) अनुभव घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा खऱ्या अर्थाने समजून घ्यायच्या असतील, तर एसी गाड्यांमधून बाहेर पडून थेट शेतात जावे लागेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या संवाद दौऱ्याला आणि बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष शाहूराजे शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी

विठ्ठल शेलार (तालुकाध्यक्ष)

योगेश सोनवणे (शहराध्यक्ष)

सुभाष निकम

किरण ठाकरे (युवक तालुकाध्यक्ष) व इतर असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande