
बीड, 03 जुलै, (हिं.स.)। शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी येथे एका मिठाई उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या 'सॅफोलाईट' (सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सिलेट) या अखाद्य रासायनिक भेसळकारकाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कारखान्याचा मालक याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिठाई पांढरी आणि आकर्षक दिसण्यासाठी या प्रतिबंधित रसायनाचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाढे (वय २७, रा. बीड) यांनी या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दहिवंडी येथील कारखान्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी गाढे यांनी दोन पंचांसह सदर कारखान्यात छापा टाकला. या कारवाईत पेढीचा मालक हा उपस्थित आढळला.
या छाप्यादरम्यान कारखान्यातून १८ किलो व्हाईट मिल्क केक, ४० किलो लूज बर्फी, १२० किलो कच्चा खवा, २५ किलो मोतीचूर दाणा आणि कापड छपाई व रंगकामात वापरले जाणारे ३ किलो 'सॅफोलाईट' हे रासायनिक भेसळकारक जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे विश्लेषण करण्यासाठी एकूण १७ नमुने ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित ३५ हजार ५३६ रुपये किमतीचा संशयास्पद, असुरक्षित व नाशवंत साठा मालकाच्या संमतीने खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आला. आरोपीने मिठाईला पांढरेपण आणण्यासाठी या घातक रसायनाचा वापर केल्याची कबुली दिली असून, खरेदी बिल सादर न केल्याने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम ५७ सह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक राजेश रंगनाथ गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis