
टोरोंटो, 03 जुलै (हिं.स.)। ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ऐतिहासिक गोल आणि अतिरिक्त वेळेत गोंकालो रामोसच्या विजयी हेडरच्या जोरावर पोर्तुगालने शुक्रवारी फीफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 32 सामन्यात क्रोएशियाचा 2-1 असा पराभव करत अंतिम-16 मध्ये प्रवेश केला. सामन्याच्या अखेरच्या क्षणी क्रोएशियाने बरोबरीचा गोल केला होता, मात्र व्हीएआर तपासणीनंतर तो ऑफसाइड ठरवत रद्द करण्यात आला.
सामन्यातील पहिले गोल क्रोएशियाने 53व्या मिनिटाला केले. अनुभवी विंगर इव्हान पेरिसिचने पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाला चकवत अप्रतिम फिनिश करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर काही मिनिटांतच रोनाल्डोने चेंडू जाळ्यात धाडला, मात्र ऑफसाइडमुळे तो गोल ग्राह्य धरला गेला नाही.
69व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनाल्टी मिळाली. रेनाटो वेइगाला निकोला व्लासिचने पेनाल्टी बॉक्समध्ये पाडल्यानंतर व्हीएआरच्या पुनरावलोकनानंतर पंचांनी पेनाल्टीचा निर्णय दिला. ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोणतीही चूक न करता स्पॉट किकचे गोलमध्ये रूपांतर करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. विश्वचषकाच्या नॉकआउट टप्प्यातील रोनाल्डोचा हा पहिलाच गोल ठरला. त्यानंतर दोन्ही संघांनी सातत्याने आक्रमणे केली. क्रोएशियाच्या मातेओ कोवाचिचचा दमदार फटका गोलरक्षक डिओगो कोस्टाने पोस्टच्या दिशेने ढकलून परतवला, तर मारिओ पासालिचचा हेडर थोडक्यात बाहेर गेला.
निर्धारित वेळ संपल्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या चौथ्या मिनिटाला राफेल लियाओच्या शानदार पासवर गोंकालो रामोसने हेडर करत पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. नाट्य इथेच संपले नाही. सामन्याच्या अखेरच्या क्षणी योश्को ग्वार्डियोलने क्रोएशियासाठी बरोबरीचा गोल केला, मात्र व्हीएआर तपासणीत तो ऑफसाइड असल्याचे आढळल्याने गोल रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे क्रोएशियाचे खेळाडू आणि समर्थक निराश झाले, तर पोर्तुगालने विजयाचा जल्लोष साजरा केला. या विजयासह पोर्तुगालने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला असून, 7 जुलै रोजी डॅलसमध्ये त्याचा सामना स्पेनशी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule