पुणे - पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, 03 जुलै (हिं.स.)। सन २०२६-२७ साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पीक विमा योजनेत मृग व आंबिया बहार हंगामासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ, द्राक्ष तसेच हळद व अंजीर या फळप
पुणे - पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन


पुणे, 03 जुलै (हिं.स.)।

सन २०२६-२७ साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पीक विमा योजनेत मृग व आंबिया बहार हंगामासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ, द्राक्ष तसेच हळद व अंजीर या फळपिकांचा समावेश असून योजनेच्या लाभासाठी १४ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षेत्र २० गुंठे व कमाल ४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण लागू राहणार आहे. शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी, डिजीटल पीक संरक्षण नोंद, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ टॅगिंग फोटो व भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी कागदपत्र बंधनकारक आहे.

कर्जदार शेतक-यांसाठी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. एका तालुक्यात ५०० पेक्षा जास्त विमा अर्ज असल्यास, त्या ठिकाणी विमा कंपनी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाने फळबागेची क्षेत्र पडताळणी करेल आणि ५०० पेक्षा कमी विमा अर्ज असल्यास, त्या ठिकाणी विमा कंपनी कृषी विभागाच्या सहकार्याने प्रत्यक्ष फळबाग लागवड क्षेत्र पडताळणी करेल.

पुणे विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स, विसावा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी कार्यालय अथवा विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. जेजूरकर यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande