बीड जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची पेरणी खोळंबली; गतवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ २६% पेरण्या पूर्ण
बीड, 03 जुलै (हिं.स.)। यंदा मान्सून लांबल्यामुळे बीड जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या असून, जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २६ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गतवर्षी जूनअखेरपर्यंत तब्बल ८१ टक्के क्षेत्रावर प
बीड जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची पेरणी खोळंबली; गतवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ २६% पेरण्या पूर्ण


बीड, 03 जुलै (हिं.स.)।

यंदा मान्सून लांबल्यामुळे बीड जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या असून, जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २६ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गतवर्षी जूनअखेरपर्यंत तब्बल ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती, ज्याच्या तुलनेत यंदाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे रखडलेल्या शेतीकामांना काहीशी गती मिळाली असून २ जुलैअखेर २ लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २१.६ टक्के पाऊस झाला असून, धरणे भरण्यासाठी आणि पिकांना जीवदान देण्यासाठी अजूनही दमदार पावसाची नितांत गरज आहे. कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार, बीड, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर आणि शिरूर या ८ तालुक्यांत १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून येथील परिस्थिती पेरणीयोग्य झाली आहे. याउलट, आष्टी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जमिनीमध्ये बियाणे रुजण्यासाठी पुरेशी ओल असणे आवश्यक असल्याने, किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande