

- माओवादविरोधी मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल
मुंबई, ३ जुलै (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानादरम्यान उत्कृष्ट कामगिरी, धाडसी कारवाया, शौर्य आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. गृह विभागाच्या निर्णयानुसार पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या पिपिंग समारंभात या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
वेगवर्धित पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनिल बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. समारंभात त्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे (पिप्स) लावून त्यांना पदोन्नती प्रदान करण्यात आली.
यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादप्रभावित भागात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने पोलीस दलात गुणवत्ता, शौर्य आणि समर्पणाची भावना अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माओवादविरोधी मोहिमेतील अनुभव, विविध आव्हाने आणि दुर्गम भागातील कार्यपद्धतीचीही त्यांनी माहिती घेतली.पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाला आजपर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, २० गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके, १,५१० पोलीस महासंचालक पदके तसेच ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या समारंभाला अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, डॉ. निखिल गुप्ता, शिरीष जैन, यशस्वी यादव, डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.---------------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond