
लातूर, 03 जुलै (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चोरट्याला जेरबंद करत तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून चोरीतील रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण ५२ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहरात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना गुप्त माहितीदारामार्फत नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन मार्गावर एक संशयित इसम चोरीचे मोबाईल घेऊन उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव दिनेश माधव टेकाळे ऊर्फ शंकर दत्तात्रय पाचाळ (वय ३४, रा. हरिभाऊ नगर, कृपासदन रोड, लातूर) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ७ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने लातूर शहरातील दोन मेडिकल दुकानांमध्ये चोरी केल्याची तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून विवो, सॅमसंग आदी कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच चोरीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ११/२०२६, ३०/२०२६ आणि ३१५/२०२६ या तीन गुन्ह्यांची उकल झाली. आरोपीकडून एकूण ५२ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis