
परभणी, 03 जुलै, (हिं.स.)। सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वसंतराव खारकर सभागृहात सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्या ‘हात मदतीचा’ या शालेय साहित्य वाटपाच्या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार 03 जूलै रोजी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
दलितमित्र कै. श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्षानिमित्त तसेच साने गुरुजी कथामालेचे संस्थापक कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी कै. श्रीरामजी भांगडिया व कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी माधव लोकूलवार होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, मुख्याध्यापक संजय धारासुरकर, नगरसेविका शांताबाई रघुवंशी, उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड, प्रा. राजेश बाहेती, कन्या सेलू केंद्रप्रमुख शेख मोजम, सीपीएस डासाळा केंद्रप्रमुख विजय तुरकर, प्रशांत रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील, देवेंद्र कुरा तसेच निर्मिक कोचिंग क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक व सामाजिक सहकार्य वाढवून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमिता जवळेकर, जयश्री सोन्नेकर, कृष्णा पांचाळ, रुपाली कुर्डे, धीरज दूधगोंडे, विठ्ठल काळे, बाबासाहेब बदाले, श्याम मुंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.आठ वर्षांत 2 हजार 793 विद्यार्थ्यांना लाभ... प्रास्ताविकात गायकवाड यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, मागील आठ वर्षांपासून शहरातील दानशूर नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत तब्बल 2 हजार 793 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून सध्या सेलू शहरातील पाच शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. हात मदतीचा हा उपक्रम कोण्या एका व्यक्तीचा नसून सेलू शहरातील दानशूर नागरिकांचा आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबविता आला आहे. त्यांनी ‘पाय नाही, हात ओढा; कदाचित आपल्यातीलच कोणी वर येईल’ हा संदेश देत समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis