किनवट येथे 'अपर जिल्हाधिकारी' कार्यालयाला विरोध
नांदेड, 03 जुलै (हिं.स.)। जिल्हा मुख्यालयापासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट येथे प्रशासकीय सोयीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ''अपर जिल्हाधिकारी'' कार्यालयाला हदगाव व हिमायतनगर तालुक्याकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. खासदार नागेश आष्टीकर आण
किनवट येथे 'अपर जिल्हाधिकारी' कार्यालयाला विरोध


नांदेड, 03 जुलै (हिं.स.)।

जिल्हा मुख्यालयापासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट येथे प्रशासकीय सोयीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 'अपर जिल्हाधिकारी' कार्यालयाला हदगाव व हिमायतनगर तालुक्याकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. खासदार नागेश आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे किनवटच्या अपेक्षित विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

१९९२ ते २०११ या कालावधीत हदगाव व हिमायतनगर हे तालुके किनवट उपविभागाचा भाग होते. १९ वर्षे प्रशासकीयदृष्ट्या एकत्र राहिल्यानंतर आता या कार्यालयाला विरोध का करण्यात येत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना महसूल, दाखले व परवाने यांसारख्या सेवा सुलभ व जलद मिळाव्यात, हा या कार्यालयाचा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

लोकसभा निवडणुकीत किनवट मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीही या विरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे विकासासाठी दिलेली मते विकासालाच रोखण्यासाठी वापरली जात आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. २०११ मध्ये शासन धोरणानुसार किनवट उपविभागातून हदगाव व हिमायतनगर हे तालुके वेगळे केले होते. आता पुन्हा प्रशासकीय सोयीसाठी किनवटशी जोडण्याच्या प्रक्रियेला विरोध झाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande