
अमरावती, ३ जुलै (हिं.स.) : शहरातील विविध विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेताना महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आता कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा. जनप्रतिनिधींनी सांगितलेली कामे तत्काळ पूर्ण करा अशा शब्दांत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावले.
महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली. यावेळी स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम, उद्यान, विद्युत व्यवस्था तसेच विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महापौरांनी प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत विभागांमध्ये परस्पर समन्वय वाढविण्याच्या सूचना दिल्या. अनेक विकासकामे ही एकापेक्षा अधिक विभागांशी संबंधित असल्याने योग्य नियोजन आणि संवाद असल्यास कामांना गती मिळेल, अनावश्यक विलंब टळेल आणि नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या कार्यक्षेत्रातील नगरसेवकांशी नियमित संपर्क ठेवून त्यांच्या सूचनांना प्राधान्य द्यावे. नागरिकांच्या समस्या सर्वप्रथम लोकप्रतिनिधींकडून प्रशासनापर्यंत पोहोचत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, रस्त्यांची देखभाल, सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करून प्रलंबित कामांचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी